यावर्षी दिग्गज कलाकारांनी या दुनियेतून एक्झीट घेतली. त्यांचे आपल्यात नसणे हे खूपच दुःखदायी असणार आहे. बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यापासून ते मराठीतील ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांच्यापर्यंत अनेकांनी आपला निरोप घेतला. यात सिद्धार्थ शुक्ला सारख्या तरुण अभिनेत्याचे जाणे मनाला चटका लावणारे होते. आज आपण अशाच काही कलाकारांना आठवूया, त्यांना आदरांजली वाहवूयात..
दिलीप कुमार
बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी वार्धक्याशी संबंधित त्रासामुळे रुग्णालयात निधन झाले. अभिनयाचा बादशाह असलेल्या दिलीप साब यांची एक खास लकब आणि अभिनय शैली होती. भारतात स्टारडम रुजवणाऱ्यांपैकी ते प्रथम होते. खऱ्या अर्थाने भारताचा पहिला सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख होती.
दिलीप साब यांचा जन्म ११ डिसेंबर रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे युसुफ खान या नावाने फळ व्यापारी लाला गुलाम सरवर यांच्या घरी झाला. पुढे ही सरवार कुटुंब महाराष्ट्रातील नाशिकमध्ये देवळाली येथे आले. युसुफ यांचे शिक्षणही देवळालीतील बार्न्स स्कूलमध्ये झाले. दिलीप कुमार यांना १९४४ मध्ये अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित 'ज्वार भाटा' हा पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटामुळे त्यांनी तत्कालिन फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले.
सुरेखा सिक्री
ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. 16 जुलै 2021 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना तब्बल तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या 75 वर्षांच्या होत्या.
उत्तर प्रदेशच्या रहिवासी असलेल्या सुरेखा यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून (एनएसडी) पदवीचे शिक्षण घेतले. यांना 1989मध्ये संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1978मध्ये राजकीय ड्राम्यावर आधारित 'किस्सा खुर्ची का' या चित्रपटातून केली. त्यांना तीन वेळा बेस्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुरेखा यांना कलर्सवाहिनीवरील बालिका वधु या मालिकेतील कल्याणी देवीच्या भूमिकेसाठी स्मरणात ठेवले जाईल.
सिद्धार्थ शुक्ला
बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने 2 सप्टेंबर रोजी निधन झाल्याच्या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली. सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
सिद्धार्थ शुक्ला अभिनेता, मॉडेल आणि होस्ट होता. त्याने एक मॉडेल म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिका त्याने अत्यंत उत्तमरित्या पार पाडल्या होत्या. याचबरोबर त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले होते. बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी या रिऍलिटी शोचे तो विजेते होता. येथून तो फारच प्रसिद्ध झाला होता.
अमित मिस्त्री
विनोदी अभिनेता अमित मिस्त्रीच्या निधनाची बातमी आल्यामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. अमित मिस्त्री यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे लगेच निधन झाले. अवघ्या ४७व्या वर्षी अमित मिस्त्रीला देवाज्ञा झाली. मृत्यूसमयी तो आपल्या अंधेरीतील राहत्या घरी आपल्या आईवडिलांसोबत होता. न्याहारी केल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला व तो इतका तीव्र होता की कुठलीही मदत पोहोचेपर्यंत त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते.
श्रवण राठोड
ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
'आशिकी'पासून ‘साजन’, ’दिल हैं के मानता नहीं’, ‘सडक’, राजा हिंदुस्थानी’, ‘परदेस’ सारख्या असंख्य चित्रपटांना त्यांनी हिट संगीत दिले आणि बॉलिवूड गाजविले. मात्र, गुलशन कुमार यांच्या हत्येत नदीमचा हात आहे. या झालेल्या आरोपामुळे नदीम लंडनला निघून गेला. त्यानंतरही श्रावण यांनी नदीमची साथ सोडली नाही आणि त्यांनी दुबईत भेटत आपली गाणी कंपोझ करणं सुरूच ठेवले. २००५ साली ही जोडी तुटली. श्रवण यांनी स्वतंत्रपणे मराठी चित्रपट ‘ई-मेल फेमेल’ साठी एक ‘आयटम सॉंग’ संगीतबद्ध केले होते. त्यांची मुलेही संगीतकार असून बॉलिवूडमध्ये संगीतकार-द्वयी संजीव-दर्शन म्हणून प्रसिद्ध आहेत.
किशोर नांदलस्कर
ज्येष्ठ अभिनेता किशोर नांदलस्कर यांचं 20 एप्रिल रोजी निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.
किशोर नांदलस्कर यांनी रंगभूमीपासून सुरू केलेला प्रवास दूरदर्शन मालिका ते चित्रपट असा दीर्घ होता. मराठीसह हिंदी मालिका, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रात त्यांची कारकिर्द गाजली. ‘हलचल’, ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, 'सिंघम' यासारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटातून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. जिस देश में गंगा रहता है’ या चित्रपटात नांदलस्करांनी सन्नाटा ही भूमिका साकारली होती. हे भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. गोविंदासोबतची त्यांची ऑनस्क्रिन केमेस्ट्री पाहण्यासारखी होती.
बिक्रमजीत कंवरपाल
अभिनेते मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचा 1 मे रोजी 52 व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बिक्रमजीत कंवरपाल सैन्यात मेजर होते आणि तेथून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपला अभिनयाचा छंद जोपासण्यासाठी 2003 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकले. थोड्याच कालावधीत त्यांनी चित्रपट, मालिकांमध्ये उत्तम चरित्र अभिनेता म्हणून नाव कमावले. बिक्रमजीत यांनी शाहरुख खान, सलमान खान, अनिल कपूर आदी मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे.
बिक्रमजीत कंवरपाल यांनी पेज 3, रॉकेट सिंग : सेल्समन ऑफ द ईयर, आरक्षण, मर्डर 2, टू स्टेट्स, द गाझी अटॅक, जब तक हैं जान, कॉर्पोरेट, प्रेम रतन धन पायो सारखे अनेक चित्रपट आणि दिया और बाती हम, ये हैं चाहतें, कसम तेरे प्यार की, तेनाली रामा सारख्या अनेक मालिकांमधून आपल्या कडक अभिनयाची छाप सोडली. अवरोध, अनदेखी, युअर ऑनर, अनिल कपूरच्या ‘24’ व नीरज पांडे यांच्या ‘स्पेशल ऑप्स’ सारख्या वेब सिरीज मधूनही ते झळकले.
राजीव कपूर
चिंपू कपूर म्हणजेच राजीव कपूर यांची 9 फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मावळली. वयाच्या ५८व्या वर्षी प्रखर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे प्राण घेतले. चेंबूरच्या घरी त्याला आज सकाळी छातीत दुखू लागल्यामुळे जवळच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व काही वेळाने तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली.
राजीव कपूर हे राज कपूर यांचा सर्वांत लहान मुलगा. शेंडेफळ असल्यामुळे भरपूर लाडात वाढलेला. कपूर परंपरेप्रमाणे त्यालाही राज कपूरच्या दिग्दर्शनाखाली ‘राम तेरी गंगा मैली’ मधून अभिनय पदार्पणाची संधी मिळाली. मंदाकिनी सोबतच्या त्याच्या केमिस्ट्रीची भरपूर चर्चा झाली व चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. त्यानंतर लाव्हा, लव्हर बॉय, झलझला, नाग नागीन सारख्या डझनभर चित्रपटांतून त्याने अभिनय केला. नंतर ते प्रोड्युसर म्हणून कार्यरत होते व ‘प्रेम ग्रंथ’ या ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते. चिंपू कपूर उर्फ राजीव कपूर च्या निधनाने कपूर कुटुंबियांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली.
या दिग्गज कलाकारांसोबतच अनेक नाट्य कलाकार, लोककलावंत, सिने व टीव्ही क्षेत्रातील तंत्रज्ञ यांनी या वर्षी या जगाचा निरोप घेतला. काही दिवसातच आपण नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत. येणाऱ्या वर्षातील फिल्म आणि टीव्ही क्षेत्रातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहो व त्यांनी रसिक मायबापाची चांगली सेवा करण्यासाठी त्यांना बळ मिळो व सर्वांना दीर्घायुष्य लाभो इतकीच आशा आपण बाळगूयात.
हेही वाचा - Year Ender 2021 : यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले बॉलिवूड कलाकार