मुंबई -बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'आर्टिकल १५' हा चित्रपट येत्या २८ जून रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्यांनी 'मुल्क' चित्रपटातूनही गंभीर विषय हाताळला होता. आता पुन्हा एकदा 'आर्टिकल १५' या चित्रपटातून ते एका सत्य घटनेवर प्रकाश टाकणार आहेत. त्यापूर्वी 'आर्टिकल १५' म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेणं गरजेचं आहे.
'आर्टिकल १५'चा संविधानातील तिसऱ्या भागात समावेश केला गेला आहे. यामध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असल्याचे नमुद केले आहे. कोणत्याही राज्याने अथवा नागरिकाने व्यक्तीची जात, धर्म, रंग, लिंग आणि जन्माचं ठिकाण पाहून त्यांच्यामध्ये भेदभाव करू नये, असा उल्लेख यामध्ये आहे. जातीवरून होणारे गुन्हे टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'आर्टिकल १५' चा संविधानात समावेश केला आहे.