सातारा - रणरणत्या उन्हात ओसाड, उजाड माळरान आणि या माळरानावर दुष्काळ हटवण्यासाठी जगणारे हजारो हात. निमित्त होतं ते एक मे महाराष्ट्र दिन या दिवशी आयोजित महाश्रमदान. संपूर्ण महाराष्ट्राला लोकसहभागातून जलसंधारणाचा कामाचा आदर्श घालून देणारे माण तालुक्यातील हजारो श्रमकरी त्यांच्या माध्यमातून श्रमदानाचे तुफान आले होते.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यात बोथे, शिंदी बुद्रुक, हस्तनपुर, भोजलिंग डोंगरावर श्रमदान आयोजित करण्यात आले होते. तर तब्बल 67 गावांमध्ये श्रमदान सुरू आहे. महाश्रमदानानिमित्त सहभागी होण्यासाठी काल मुंबई, पुणे या ठिकाणाहून विविध संस्था, संघटनांच्या सदस्यांनी माणच्या दिशेने येऊन गावच्या शिवारात श्रमदान केले आहे.
काय पाहिजे, पाणी पाहिजे, कोण देणार "मी देणार" अशा घोषणा देतच दुष्काळाशी लढा सुरू झाला. टिकाऊ, खोरी, घमेली यांचा खणखणाट सुरू झाला आबालवृद्धांचे हात जलसंधारणाची कामे करण्यासाठी सरसावले, उणाच्या रकाची तमा न बाळगता देहभान विसरून श्रमकार्याच्या धारांनी धरणी मातेला आंघोळ घालताना प्रत्येकाच्या चेहर्यावर एक वेगळेच समाधान होतं.