मुंबई - 'धर्मा प्रोडक्शन'च्या सोशल मीडिया पेजवर २७ जानेवारीला काही विचित्र छटा पाहायला मिळाल्या. इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरील प्रोफाईल फोटोमध्येही काळ्या रंगाच्या छटा दिसून आल्या. यामध्ये 'द डार्क टाईम्स बिगिन नाऊ', अशा ओळीही लिहिल्या गेल्या आहेत. हे सर्व धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या 'भूत' चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.
'भूत - द हॉन्टेड शिप' या चित्रपटात अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात थरारक घटना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्येही अंगावर शहारे निर्माण करणारे संगीत ऐकू येते.
हेही वाचा -अक्षयच्या 'बेल बॉटम'ची नवी तारीख तर दीपिकाच्या नव्या चित्रपटाची घोषणा, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी
अभिनेत्री भूमी पेडणेकरचीही या चित्रपटात भूमिका पाहायला मिळणार आहे. भानू प्रताप सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
करण जोहरने नेटफ्लिक्सवरील घोस्ट स्टोरीजमधील एका भागाचे दिग्दर्शन केले होते. मात्र, या सीरिजला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या 'भूत' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळावा, यासाठी तो प्रयत्न करत आहे.
हेही वाचा -अंगावर शहारे आणणारा 'शिकारा'चा दुसरा ट्रेलर रिलीज
आगामी काळात या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेले बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल', 'शेरशाह', 'ब्रम्हास्त्र', 'तख्त' आणि 'दोस्ताना २' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.