मुंबई - बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट असलेला 'कलंक' चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. भव्यदिव्य सेट्स, गाणी आणि विशेष म्हणजे मोठे कलाकार असुनही या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. वरुण धवनच्या करिअरमधला हा पहिला फ्लॉप चित्रपट ठरला. त्यामुळे त्याने पहिल्यांदाच या चित्रपटाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. तर, करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन' अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. मात्र, त्यानंतर या चित्रपटाला उतरती कळा लागली होती.
एका माध्यमाशी बोलताना वरुणने या चित्रपटाच्या अपयशाबद्दल पहिल्यांदा त्याचं मत व्यक्त केलं. हा चित्रपट चालण्यासारखा नव्हताच. कारण, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला नाही. या चित्रपटाचं अपयश हे माझ्यासाठी एक धडा आहे', असं तो म्हणाला.