मराठी चित्रपट आशयघन चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे परंतु त्याला राजाश्रय मिळण्याची नेहमीच अपेक्षा असते. ‘जिंदगानी’ नावाचा मराठी चित्रपट येऊ घातलाय ज्याच्या पोस्टरचे नाशिक येथे चालू असलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सन्माननीय कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. तर या पोस्टर अनावरण सोहळ्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा घोषित करण्यात आली. बदलणाऱ्या काळात आपण सुद्धा बदलत असलो तरी आपलं मूळ हे नेहमीच लक्षात ठेवायचं असा संदेश देणाऱ्या या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन विनायक साळवे यांनी तर निर्मिती सुनीता शिंदे यांनी नर्मदा सिनेव्हिजन्स या निर्मिती संस्थे मार्फत केली आहे.
मराठी चित्रपट हा नेहमीच प्रगल्भ राहिला असून मराठी चित्रपटांतून मांडण्यात येणारे विषय हे नेहमीच समाजाला आरसा दाखवत आले आहेत. चित्रपटाचा विषय हा त्याला त्याचा प्रेक्षक मिळवून देत असतो. असाच एक सामाजिक विषय मांडणारा चित्रपट म्हणजे 'जिंदगांनी'. जिंदगानीच्या या पोस्टर अनावरण सोहळ्यात छगन भुजबळ म्हणाले की, 'एका वेगळ्या विषयाचा आणि वेगळ्या आशयाचा हा चित्रपट असून, अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचा गौरव झाला आहे. नाशिकचे स्थानिक कलाकार आणि येथीलच तंत्रज्ञ यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्याचा गौरव करण्यासाठी हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन सगळ्यांनी बघायला हवा'.