महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शैक्षणिक पध्दतीवर प्रकाशझोत टाकणारी वेब सिरीज 'बदली'चा ट्रेलर रिलीज - Badlee Trailer बदली

प्लॅनेट मराठी वरील ‘बदली’ या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ग्रामीण भागातील शैक्षणिक पध्दतीवर प्रकाशझोत टाकणारी ‘बदली’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

बदली ट्रेलर रिलीज
बदली ट्रेलर रिलीज

By

Published : Jan 11, 2022, 6:20 PM IST

Updated : Jan 11, 2022, 8:40 PM IST

मुंबई - सध्या कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे पुन्हा लॉकडाऊनसदृश परिस्थिती जरी निर्माण झाली असली तरी मनोरंजनसृष्टी त्यास तोंड देण्यासाठी सज्ज आहे. मराठी चित्रपट प्रदर्शन प्रक्रियेत बदल न करताना दिसत असून इतर उपक्रमही सुरु आहेत. डिजिटल माध्यमाची सोय असल्यामुळे चित्रपट ट्रेलर-पोस्टर लॉचिंग वगैरे समाज माध्यमांवरून करीत आहेत. याच पद्धतीने नुकताच प्लॅनेट मराठी वरील ‘बदली’ या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

निमशहरी भाग जिथे किमान सोयीसुविधा असतात त्या भागात स्थायिक असलेल्या शिक्षकाची बदली जेव्हा पहिल्यांदा दळणवळण आणि सोयीसुविधांची वानवा असलेल्या एखाद्या खेड्यात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत होते. विद्यार्थ्यांना गोळा करण्यापासून ते त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यापर्यंतचे काम या शिक्षकांना करावे लागते. ग्रामीण भागातील शैक्षणिक पध्दतीवर प्रकाशझोत टाकणारी ‘बदली’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

या वेब सिरीजबाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “‘बदली' ही एक सत्य परिस्थितीवर आधारलेली वेब सिरीज असून आमचा प्रयत्न आहे की फक्त ग्रामीणच नाही तर शहरातील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत ही वेब सिरीज पोहोचावी. या निमित्ताने गावोगावी भविष्यातील मराठी शिक्षण पद्धतीचे महत्त्व अधोरेखित होईल. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.”

"गावाकडच्या गोष्टी" या वेबसिरीजमार्फत प्रत्येक घराघरात पोहोचलेले दिग्दर्शक, लेखक नितीन पवार यांनी 'बदली' या वेब सिरीजचे लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा आणि संवाद लिहिले असून मानसी सोनटक्के यांनी 'बदली' ची निर्मिती केली आहे. छायांकन वीरधवल पाटील तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे. या वेब सिरीजचे चित्रीकरण साताऱ्यातील एका शाळेत केले आहे.

बदली ट्रेलर रिलीज

'बदली'बाबत दिग्दर्शक नितीन पवार म्हणतात, ‘’या वेब सिरीजमधून ग्रामीण भागातील शैक्षणिक वास्तव दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यातील शाळांची दृश्ये ही साताऱ्यातील एका शाळेत चित्रित केली असून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यथा इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गावाकडील कुटुंबाचा शहराकडे स्थिरस्थावर होण्याचा कल वाढला असल्यामुळे परिणामी ग्रामीण भागातील मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. उलट गावाकडे असलेल्या इंग्रजी शाळांकडे मुलांच्या भरत्या होत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण मराठी शाळांना विसरून चालणार नाही. 'बदली' च्या निमित्ताने मराठी शाळांना सुगीचे दिवस येणार असतील तर आम्हाला खूप आनंद होईल. शिक्षक हे येतील, जातील पण पहिली आपली मुलं शिकली पाहिजेत, त्यासाठी आधी आपण आपली शाळा टिकवली पाहिजे... यात आमचा मूळ हेतू हाच आहे की ओस पडत असणाऱ्या मराठी शाळांचे पुन्हा चांगले दिवस यावेत आणि यासाठी प्लॅनेट मराठीने आम्हाला सहकार्य केले आहे.’’

प्लॅनेट मराठी व अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन कृत 'बदली' ही आठ भागांची अनोखी वेब सिरीज १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा -अनन्या पांडेच्या पोस्टवर शाहिद कपूरच्या कॉमेंटने वेधले नेटिझन्सचे लक्ष

Last Updated : Jan 11, 2022, 8:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details