आजवर आपल्या संगीतासोबतच जादुई आवाजानंही संगीतप्रेमींचे कान तृप्त करणारे पार्श्वगायक अजय गोगावले यांच्या आवाजाचा काहीसा नवा ढंग लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटासाठी अजयनं एक सुरेख गाणं गायलं असून, हे गाणं संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारं ठरणार आहे. या चित्रपटाचं 'लहर आली, लहर आली गं...' हे टायटल साँग कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. या गाण्याला अजय गोगावले आणि अपूर्वा निषाद यांच्या आवाजाची सुंदर साथ लाभली आहे. गीतकार वैभव कुलकर्णी यांनी हे गाणं लिहिलं असून, संगीतकार पद्मनाथ गायकवाड यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॅार्डिंग करण्यात आलं.
शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली 'गुल्हर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहाय्यक दिग्दर्शनाकडून दिग्दर्शनाच्या मैदानात उतरल्यानंतर 'बाबो' या काहीशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या रमेश चौधरी यांनी 'गुल्हर'चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटाने नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट ज्युरी मेन्शन अवॉर्ड, साऊथ इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट फिल्म, मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ज्युरी अवॉर्ड हे पुरस्कार पटकावले असून बर्लिन लाईफ ऑफ फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये या चित्रपटाचे ऑफिशियल सिलेक्शन झाले आहे.
हेही वाचा -'गंगूबाई काठियावाडी'तील नेत्रदीपक 'ढोलिडा' गाणे रिलीज