मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ 'वॉर' चित्रपटानंतर पुन्हा एकदा 'बागी ३' चित्रपटात अॅक्शन अवतारात दिसणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. यामध्ये टायगर श्रॉफचा दमदार लुक पाहायला मिळतो.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच, ६ फेब्रुवारीला या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -'थप्पड'च्या ट्रेलरला १० मिलियन व्ह्युज, तापसीने शेअर केला व्हिडिओ
टायगर आपल्या अभिनयासोबत डान्स आणि फिटनेससाठी ओळखला जातो. तरुणाईसाठी तो फिटनेस आयकॉन आहे. त्यामुळेच 'बागी ३' मध्येही त्याचा दमदार फिटनेस पाहायला मिळणार आहे. 'बागी' आणि 'बागी २' चित्रपटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे 'बागी ३' साठीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. श्रद्धाने 'बागी'मध्ये त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. अभिनेता रितेश देशमुखचीही यामध्ये मुख्य भूमिका आहे. तर, जॅकी श्रॉफ यांचीही भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -नाशिक सुला फेस्ट : सलीम-सुलेमानच्या संगीतावर थिरकली तरुणाई
अहमद खान यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर, साजीद नादियाडवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.