वेगवेगळया पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, ती ‘झिम्मा’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या जबरदस्त अभिनेत्रींसोबत सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे. 'झिम्मा' चित्रपटाच्या शीर्षक गीताला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'झिम्मा'च्या टिझरमुळे चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता शीर्षक गीताच्या प्रदर्शित होण्याने अधिकच वाढली आहे.
'झिम्मा' चित्रपटातील ‘माझे गाव' हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. ''कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव'' असे या गाण्याचे शब्द असून हे गाणे प्रेक्षकांना अंतर्मुख करायला भाग पाडते. हे गाणे ऐकताना मन अतिशय शांत होते आणि विचारांचा वेग मंदावतो व ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे.