मुंबई -ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा - जोनासने लग्नानंतर पहिल्यांदाच बॉलिवूडच्या चित्रपटातून दमदार कमबॅक केलं आहे. हॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर बऱ्याच काळानंतर तिचा 'द स्काय ईज पिंक' हा चित्रपट ११ ऑक्टोंबरला प्रदर्शित झाला. प्रियांकाच्या कमबॅकमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तसंच, या चित्रपटाची कथादेखील सत्य घटनेवर आधारित असल्याने चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. मात्र, पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईला संथ सुरुवात झाली आहे.
प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसिम आणि रोहीत सराफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'द स्काय ईझ पिंक'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाची आतुरता होती. आयशा चौधरी या अल्पवयीन प्रेरणादायी वक्ता असलेल्या तरुणीच्या जीवनावर ही कथा आधारित होती. एका आजारामुळे आयशाचं निधन होतं. मात्र, तिची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असल्यानं आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्येही ती धैर्याने सामोरी जाते. तिच्या आईवडिलांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.