मनोरंजनसृष्टी आता सावरू लागली असून प्रतिक्षीत चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहेत. एस. एम. बालाजी प्रॉडक्शन आणि अमोल कागणे फिल्म्स् प्रस्तुत ‘इमेल फिमेल’ सुद्धा पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांनाही आपल्या भावनांना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम सापडले. मात्र अभिव्यक्त होण्याच्या या माध्यमांनी माणसाचे व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्य कसे धोक्यात आणले आहे हे दाखवून देणारा ‘इमेल फिमेल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.
चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. सोनू निगम, जावेद अली, आनंदी जोशी, ममता शर्मा यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सुप्रसिद्ध संगीतकार स्वर्गीय श्रवण राठोड आणि अभिजीत नार्वेकर यांनी संगीताची तर पार्श्वसंगीताची जबाबदारी प्रकाश नर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.
तंत्रज्ञानाने आपल्यासाठी नवनवीन सुविधा निर्माण केल्या असल्या तरी ते वापरण्याचे योग्य ते भान दिले नाही हे दाखवून देताना सोशल मीडियाचा होत असलेला चुकीचा वापर यावर ‘इमेल फिमेल’ चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रलोभनाला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय शंतनूची गोष्ट ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुणही यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे.