गेली दोनेक वर्षे मनोरंजनसृष्टीत बेभरवशाचे वातावरण होते. यावर्षीच्या सुरुवातीलाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आ वासून उभे होते. तरीही हिम्मत करून ‘झिम्मा’ नावाचा सिनेमा महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. अद्यापही महाराष्ट्रात सिनेमागृहे केवळ ५० टक्के आसनक्षमतेने सुरू आहेत. असे असतानाही मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हणायला हरकत नाही. याची सुरूवात करणारा धाडसी चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’. या चित्रपटाने ऐतिहासिक शंभरी गाठत मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला. चित्रपटसृष्टीलाही याचा मोठा फटका सहन करावा लागला. या सर्वांवर मात करीत ‘झिम्मा’ ने चित्रपटगृहात यशस्वी १०० दिवस पूर्ण केले आहेत आणि १५ व्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे. अतिशय कठीण काळात प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून १५ करोडची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट अजूनही सिनेमागृहात प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाला आहे.
‘चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' काही दिवसांपूर्वीच ऍमेझॉनवर प्रदर्शित झाला असे असतानाही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ‘झिम्मा’या चित्रपटाच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवण्यात आला आहे. ॲमेझॉन प्राईम वर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान ‘झिम्मा’ने पटकावला आहे. आजही झिम्मा सर्वत्र ट्रेंडींग ठरतोय.