मुंबई - कोरोनाच्या दोन लाटांनंतर मराठी चित्रपटसृष्टी आता पूर्वपदावर येत आहे. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर सुरू झाले आहेत. मराठी प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पहात असलेल्या आणि प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्याची क्षमता असलेल्या लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश संपादन केले. यामुळे त्यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या 'सरसेनापती हंबीरराव' च्या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढली आहे. या टीझर मधून चित्रपटाची भव्यता तर लक्षात येतेच पण चित्रपटातील संवाद आणि ऍक्शन सिक्वेन्स जबरदस्त लक्षवेधी असणार आहेत याचाही अंदाज येतो.