मुंबई - शत्रूला घरात घुसून मारणं म्हणजे सर्जिकल स्ट्राईक आणि आम्हाला सर्जिकल स्ट्राईक शिकवला छत्रपती शिवरायांनी. सन १६६३...अशा भारदस्त आवाजात 'फत्तेशिकस्त'चा टीझर सुरू होतो. शिवकालीन गनिमी काव्याची ऐतिहासिक गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. फर्जंद या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येत आहेत भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक.
राजमाता जिजाऊसाहेब, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, केशर, बाळाजी, चिमणाजी, किसना यासारख्या योध्यांच्या पराक्रमाची गाथा फत्तेशिकस्त या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल कुलकर्णी, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारखी स्टारकास्टही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
शिवाजी महाराजांचा गनिमीकावा आणि त्यांच्या युद्धनीतीच्या कथा नेहमी इतिहासात पाहायला मिळतात. आता 'फतेशिकस्त'च्या निमित्ताने शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची युद्धनिती १५ नोव्हेंबरला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.