मुंबई - राजधानी दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागांसाठी आज(शनिवारी) मतदान होत आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे १ कोटी ४७ लाखांहून अधिक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नुनेही मतदानाचा हक्क बजावला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन तिने 'प्रत्येक मत महत्वाचं', असं लिहिलं आहे.
तापसी पन्नुच्या संपूर्ण कुटुंबाने दिल्लीतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, तापसी लवकरच 'थप्पड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात या चित्रपटाद्वारे आवाज उठवला जात आहे.
अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तापसीसोबत यामध्ये रत्ना पाठक, मानव कौल, दिया मिर्झा, तन्वी आझमी आणि राम कपूर यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाशिवाय ती महिला क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्येही भूमिका साकारणार आहे. तसेच, 'हसिन दिलरुबा' या चित्रपटातही ती विक्रांत मेस्सीसोबत झळकणार आहे.