अभिनेत्री तन्वी हेगडेचा बालकलाकार ते चित्रपट नायिका हा प्रवास तिच्यातील अभिनयसंपदा वाढविणारा ठरला. 'जान की कसम' आणि 'गज गामिनी' या चित्रपटांमध्ये तन्वी बालकलाकाराच्या रूपात झळकली. त्यानंतर 'राहुल', 'पिता', 'विरुद्ध', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'चल चले', 'धुरंधर भाटवडेकर', 'अथांग', 'शिवा' या चित्रपटांसोबतच 'शाका लाका बूम बूम' आणि 'सोन परी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आजवरच्या कारकिर्दीत तन्वीनं फार चित्रपट केले नाहीत. मोजक्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तन्वीनं साकारलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या ठरल्या आहेत. 'अलिप्त' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे तन्वीनं पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
निर्माते अनिकेत विनायक कारंजकर यांनी 'कटिंग चाय प्रॉडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत 'अलिप्त' या चित्रपटाची निर्मिती केली असून 'संजू एंटरटेनमेंट'चे संजय लक्ष्मणराव यादव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शक मनोज सुधाकर येरुणकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्वप्नील प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं असून, मुख्य भूमिकाही साकारली आहे.
'अलिप्त’ मधील भूमिकेबद्दल तन्वी म्हणाली की, “या सिनेमातील कॅरेक्टर आणि कथानकाबाबत जास्त काही रिव्हील करता येणार नाही. ज्या चित्रपटांमधील भूमिका माझ्या मनाला भिडतात त्याच मी स्विकारते. दिग्दर्शक मनोज येरुणकर यांनी जेव्हा 'अलिप्त'चं कथानक ऐकवलं, तेव्हा त्यात नावीन्याच्या विविध छटा जाणवल्या. माझ्या व्यक्तिरेखेतील नाना पैलूंची जाणीव झाली. त्यामुळं 'अलिप्त'ला नकार देण्याचं कारणच नव्हतं. या चित्रपटात काम करताना एका प्रोफेशनल युनिटसोबत मनासारखं काम करायला मिळाल्याचं समाधान लाभलं. या चित्रपटाच्या शीर्षकासोबत देण्यात आलेली 'भूतकाळातील खुणा वर्तमानात अलिप्त होत नाहीत, तर त्या पुन्हा जन्म घेतात...' ही टॅगलाईन खूप महत्त्वाची असून, कथानकाचा गाभा सांगणारी आहे. स्वप्नीलसह इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही आनंददायी होता.”