मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता ही #MeeToo चळवळीमुळे बरीच चर्चेत आली होती. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप लावले होते. अलिकडेच एका महिला कोरिओग्राफरनेही गणेश आचार्य यांच्या विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे बॉलिवूडने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे वक्तव्य तनुश्रीने केले आहे.
'आता वेळ आली आहे, की बॉलिवूड आणि इतर भारतीय सिने इंडस्ट्रीने कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकायला हवा. मोठ्या सुपरस्टार्सच्या आधाराने असे लोक लपून राहतात. इतर नवीन लोकांना त्रास देतात', असे तनुश्रीने म्हटले आहे.
हेही वाचा -'आता तरी वय कमी लिहा', नीना गुप्ताची 'गुगल'ला विनंती
'गणेश आचार्य विरोधात बऱ्याच तक्रारी सध्या समोर आल्या आहेत. फसवणूक, डान्सर्सच्या मानधनामध्ये कपात तसेच, महिला कोरिओग्राफर्ससोबत गैरवर्तन अशा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. जर, अशा व्यक्तीसोबत दिग्दर्शक अभिनेते काम करण्यास तयार होत असतील, तर त्यांचाही अशा कामामध्ये सहभाग असेल, असेही तनुश्रीने म्हटले.
हेही वाचा -'दूरदर्शन' सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज
मीटू आंदोलनादरम्यान तनुश्रीने गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. 'हॉर्न ओके' चित्रपटादरम्यान तिच्यासोबत ज्यांनी गैरवर्तन केले होते, त्यांच्यामध्ये आचार्य यांचाही समावेश होता. या सर्व गोष्टींमुळे तिचे आर्थिक नुकसानही झाले. तसेच मानसिक धक्का देखील तिला पचवावा लागला. त्यामुळे सिनेक्षेत्राला रामराम ठोकून तिने बॉलिवूडमधून एक्झिट घेतली.