महाराष्ट्र

maharashtra

'तांडव'वरून तांडव! चार राज्यांचे पोलीस 'तांडव'च्या मागे

By

Published : Jan 21, 2021, 12:27 PM IST

Updated : Jan 21, 2021, 5:16 PM IST

वेबसीरिज 'तांडव'वरून देशभरात वादंग माजले आहे. या वेबसीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल झाल्यात. अनेक ठिकाणी न्यायालयातही 'तांडव'विरोधात याचिका दाखल झाल्या आहेत.

'तांडव'कांड! चार राज्यांचे पोलीस 'तांडव'च्या मागे
'तांडव'कांड! चार राज्यांचे पोलीस 'तांडव'च्या मागे

"'डॉन' का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है..." 'डॉन' चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकला असेल. याच डायलॉगचा प्रत्यय सध्या 'तांडव' या वेबसीरिजच्या निमित्ताने येत आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणावरून 'तांडव' वेबसीरिजविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तक्रार दाखल झाल्या आहेत. त्यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांतील पोलीस सध्या 'तांडव'च्या मागे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

अली अब्बास जफर यांच्या घरी यूपी पोलिसांची टीम

गौरव सोलंकी, अली अब्बास जफर यांच्या घरी यूपी पोलिसांची टीम

वेबसीरिजचे निर्माते अली अब्बास जफर आणि लेखक गौरव सोलंकी यांच्या घरी गुरूवारी उत्तर प्रदेश पोलिसांची टीम दाखल झाली. या टीमकडून जफर यांच्या घरी पोलिसांनी नोटीस दिली आहे. येत्या 27 जानेवारी रोजी लखनौमध्ये हजर होण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नोटीस दिली त्या वेळी जफर घरी नव्हते अशी माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अली अब्बास जफर यांच्या घरी यूपी पोलिसांची टीम

देशभरात रणकंदन, तक्रारी, याचिका

अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारीत झालेल्या 'तांडव' वेबसीरिजविरोधात देशभरात सध्या रणकंदन सुरू आहे. वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत वेब सीरिजच्या निर्माते, कलाकारांविरोधात देशभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल झाल्या आहेत. यानंतर या राज्यांतील पोलीस आता 'तांडव'चे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची चौकशी करणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश आणि मुंबईतही तांडव विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे चार राज्यांचे पोलीस 'तांडव'च्या मागे असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

तांडव विरोधात संतप्त निदर्शने

चार राज्यांमध्ये एफआयआर

'तांडव' वेबसीरिजविरोधात मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल झाला आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेने मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील ओमती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वेब सीरिजमध्ये हिंदूंविरोधी चूकीच्या शब्दांचा वापर केल्याचे यात म्हटले आहे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात 'तांडव'विरोधात तक्रार दाखल झाली. हिंदू देवतांचा अपमान केल्याचे यात म्हटले आहे. यानंतर यूपी पोलिसांकडून चौकशीसाठी 4 पोलिसांचे पथक मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पथक तांडवचे निर्माते आणि कलाकारांची चौकशी करणार आहे. दिल्लीतही निवृत्त एसीपी वेद भूषण यांनी 'तांडव'विरोधात तक्रार दाखल केली आहे.

दिल्ली, यूपी, इंदूरमध्ये याचिका

दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयातही 'तांडव'विरोधात याचिका दाखल झाली. हिंदू सेनेचे संस्थापक विष्णु गुप्त यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेतून 'तांडव'चे निर्माते आणि कलाकारांविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यूपीच्या जौनपूर न्यायालयातही 'तांडव'च्या निर्मात्यांविरोधात याचिका दाखल झाली. वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी याचिका दाखल करीत आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

इंदूरमधील जिल्हा न्यायालयात मित्र मेला सोशल वेल्फेअर सोसायटीनेही एक याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने दोन दिवस तपास करून प्रकरण नोंदवून घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.

तांडवविरोधात रणकंदन

हेही वाचा -ओटीटीसाठीही सेन्सॉरशीप असावी - भाजप

मंत्रालयाने बजावले समन्स

'तांडव' वेबसीरिजवरून सुरू असलेल्या वादंगानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने अमेझॉन प्राईमच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावत 'तांडव'च्या कन्टेन्टविषयी उत्तर मागविले होते.

निर्मात्यांनी मागितली माफी

वांदगानंतर 'तांडव'चे निर्माते अली अब्बास जफर यांनी सोशल मीडियावरून जाहीर माफी मागितली. सीरिजमधील कथा काल्पनिक असून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू यात नसल्याचं सांगत त्यांनी याविषयी जाहीर माफी मागितली.

हेही वाचा -हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांवर ४८ तासांत कारवाई करा - राम कदम

राजकीय नेत्यांकडून इशारा

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी 'तांडव'चे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. वेब सीरिजमधून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी तांडवच्या निर्मात्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. निर्मात्यांचा परवाना रद्द केला जावा असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी 'तांडव'विरोधात जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करीत निर्मात्यांना अटक करण्याची मागणी केली. वेब सीरिजवर बंदीचीही मागणी त्यांनी केली आहे.

साध्वी ऋतुंभरा यांनीही 'तांडव' वेब सीरिजच्या निर्मात्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. हिंदू समाज अशा लोकांविरोधात तांडव करेल असा इशारा त्यांनी दिला.

हिंदू संघटनांची निदर्शने

उज्जैनमध्ये हिंदू संघटनांनी 'तांडव'विरोधात निदर्शने करीत अभिनेता सैफ अली खानचा पुतळा जाळला. याशिवाय महाराष्ट्रातही भाजप नेते राम कदम यांनी तांडवविरोधात आंदोलन केले. देशात इतरही अनेक ठिकाणी 'तांडव'विरोधात निदर्शने होताना दिसत आहे.

हेही वाचा -तांडव : दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Last Updated : Jan 21, 2021, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details