मुंबई - 'छिछोरे' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली आहे. कॉलेज जीवनातील मजा मस्तीवर आधारित असलेल्या या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि श्रध्दा कपूर यांची जोडी पाहायला मिळेल. या चित्रपटात ताहीर राज भसीन या अभिनेत्याच्या बाबतीतला एक खुलासा खूपच चर्चेत आला आहे. त्याने या चित्रपटाच्या शूटींगसाठी तब्बल २०० पाकीट सिगारेट ओढली आहेत.
ताहीर राज भसीन याने ओढलेल्या सिगारेटींची संख्या चकित करणारी आहे. २०० पाकिटांचा त्याने धूर सोडलाय. मात्र, हे २०० पाकिट सिगारेट ऑर्गॅनिक होते. ग्रीन टी आणि तुळशीची पाने यांच्यापासून ही सिगरेट बनली होती.
ताहीर राज भसीन याची 'छिछोरे'मधील भूमिका एका चेनस्मोकरची आहे. खेळामध्ये तो कॉलेजचा पोस्टर बॉय असला तरीही तो सलग स्मोकिंग करीत असतो. खासगी आयुष्यात तो धुम्रपान करीत नाही. मात्र, व्यक्तीरेखेची गरज म्हणून त्याला हे करणे भाग होते. धुम्रपानाचे तो कधीच समर्थन करीत नाही किंवा याला चालना मिळेल, अशी गोष्टही करीत नाही. सिनेमातील भूमिका वास्तववादी व्हावी यासाठी त्याने धुम्रपान केले. चित्रपटाच्या टीमने त्याला सहकार्य केले आणि ऑर्गॅनिक सिगरेट शूटींगमध्ये वापरण्यात आल्या. ग्रीन टी आणि तुळशीची पाने यांच्यापासून बनवण्यात आलेल्या या सिगरेटमधून ओढण्यात येणारा धूर तंबाखूच्या सिगारेटसारखाच वाटतो.
'छिछोरे' या चित्रपटातून निर्माते साजिद नाडियाडवाला आणि फॉक्स स्टार स्टुडियोज पुन्हा एकदा एकत्र काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी 'जुड़वां 2' आणि 'बागी 2' सारखे चित्रपट बनवले होते. छिछोरेचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलंय. ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.