मुंबई - क्रिकेट विश्वचषक सामन्यामध्ये ऐतिहासिक ठरलेल्या १९८३ सालच्या विश्वचषकावर आधारित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांच्या भूमिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर, ताहीर राज भसीन हा लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
ताहीरने सुनील गावस्कर यांच्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'ज्यांच्या फलंदाजीने शत्रूंचे छक्के उडले, अशा लिटिल मास्टर यांच्या भूमिकेत', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे.
हेही वाचा -आयफा पुरस्कार सोहळ्यात मध्यप्रदेश सरकार करणार दीपिकाचा सन्मान
२५ जून १९८३ साली भारताने प्रथमच विश्वचषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. १९७५ आणि १९७९ च्या विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता या स्पर्धेत कपिलदेव आणि त्यांच्या सहकार्यांकडून फारशा अपेक्षा नव्हत्या. मात्र, या संघाने चमत्कार घडवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण केले. याच विश्वचषक सामन्यावर आधारित कबिर खान दिग्दर्शित '८३' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.