स्वप्न पाहताना आपण कोण आहोत, काय आहोत, हे स्वप्न आपल्याकडून पूर्ण होईल की नाही, असे कोणतेही प्रश्न पडत नसतात. मात्र जर ती खरोखर सत्यात उतरवायची असतील तर..?? तेव्हा मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक मेहनत, आणि स्वतःच्या स्वप्नापासून कधीच फारकत न घेणं जास्त महत्वाचं असतं. 'गली बॉय' हा देखील अश्याच परिस्थितीशी दोन हात करताना स्वप्नाची कास न सोडता स्वप्न पूर्ण करून दाखवणाऱ्या तरुणाची कथा आहे.
काय आहे कथानक -
'मुराद' म्हणजेच रणवीर सिंग हा धारावीच्या झोपडपट्टीत राहणारा एक मुस्लिम मुलगा आहे. घरी ड्रायव्हरची नोकरी करणारे वडील (विजय राज) आणि आई (अमृता सुभाष), आजी (ज्योती सुभाष), आणि सोबत प्रचंड गरिबी आहे. वडील मोठ्या हिमतीने मुलाला शिकवण्यासाठी मेहनत करतात. मात्र, शिकुन मोठं झाल्यावर मुलाने त्यांचे पैसे पूर्ण करावेत, अशीही त्यांची इच्छा आहे. अशात वडील दुसरं लग्न करून वयाने लहान असलेली एक सावत्र आई आणून ठेवतात आणि कुटुंबाचा भार अधिकच वाढवून ठेवतात.
कुटुंबाची परिस्थिती एवढी हलकीची असताना मुरादला रॅपर बनण्याची तिव्र इच्छा आहे. ही गोष्ट फक्त त्याचे मोहल्ल्यातले मित्र आणि त्याची गर्लफ्रेंड 'सखीना' म्हणजेच आलिया भटला माहिती आहे. वडीलाच्या धाकापायी आधी लपून छपून आवड जोपासणाऱ्या मुरादच्या आयुष्याला तेव्हा कलाटणी मिळते जेव्हा त्याच्या कॉलेजमध्ये तो डिजे शेर म्हणजेच 'श्रीकांत'ला भेटतो. तिथूनच मुंबईतील रॅपर्सचं एक वेगळंच विश्व त्याच्यासमोर उलगडत जातं.
एकीकडे रॅपर होण्याचा ध्यास, दुसरीकडे जगण्यासाठी शिक्षण आणि मग नोकरी करण्याचा वडिलांचा दबाव अशात मुराद त्याच रॅपर बनण्याचं स्वप्न कशाप्रकारे पूर्ण करतो आणि धारावीत राहणाऱ्या गरीब घरच्या मुरादचा 'गलीबॉय' नक्की कसा बनतो, त्याचा हाच प्रवास म्हणजेच हा सिनेमा आहे.
वरवर असे रॅपर आपण अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये पहात असतो त्याच्या स्पर्धाही होत असतात. मात्र, कधीही चित्रविचित्र कपडे आणि दाढी मिश्या ठेवणाऱ्या या लोकांच्या जगण्याची वेदना संघर्ष आपण कधीच जाणून घेत नाही. मुळात ही कला आहे हेच मुरादच्या बापाप्रमाणे अनेकांना माहीत नाही. त्यामुळे या रॅपर्सकडे कायम समाजही लांबूनच पाहणं पसंत करतो. पण याच रॅपर्सचं आयुष्य पडद्यावर मांडण्याचा विचार दिग्दर्शक झोया आख्तर यांनी केलाय. त्यांच्यासोबत रिमा कागती यांनीही पटकथेवर तपशीलवार काम केलेलं आहे.