मुंबई - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा 'सुपर ३०' चित्रपट १२ जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. बिहारचे प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. अलिकडेच बिहार सरकारने हा चित्रपट बिहारमध्ये करमुक्त केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट स्वस्तात पाहायला मिळणार आहे. आज गुरुपोर्णिमा असल्यामुळे हृतिकने आनंद कुमार यांची बिहारमध्ये जाऊन भेट घेतली.
जेव्हा 'सुपर ३०'चे रिल आणि रिअल 'हिरो' एकत्र येतात....
आज गुरुपोर्णिमा असल्यामुळे हृतिकने आनंद कुमार यांची बिहारमध्ये जाऊन भेट घेतली.
आनंद कुमार यांनी त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिहारमध्ये हृतिकचे जंगी स्वागत करण्यात आले. 'गौतम बुद्ध, महावीर आणि चाणक्य यांच्या पवित्र भूमीवर, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचे स्वागत हृतिकजी', असे कॅप्शन देत आनंद यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
'सुपर ३०' चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील हृतिकच्या भूमिकेचीही प्रशंसा केली जात आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने ५० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.
या चित्रपटात हृतिकसोबत अभिनेत्री मृणाल ठाकुर देखील झळकली आहे. आनंद कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो.