मुंबई - कलाविश्वात मालिका असो, नाटक असो किंवा चित्रपट स्टारकिड्सला प्राधान्य देणे ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, आत्तापर्यंत हिंदीमध्ये हा ट्रेण्ड जास्त पाहायला मिळत होता. तोच ट्रेण्ड आता मराठी मालिकांमध्येही पाहायला मिळतो आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुला पाहते रे' या मालिकेत आता सुबोध भावेच्या मुलाची एन्ट्री होणार आहे. खुद्द सुबोध भावेनेच सोशल मीडियावरून याबाबत खुलासा केला आहे.
'तुला पाहते रे' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे. प्रेमकथेपासून सुरुवात झालेल्या या मालिकेमध्ये आता नवनविन आणि अनपेक्षीत असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यातच अभिनेता सुबोध भावे याच्या स्टारडमचे वलयही या मालिकेला आहे. त्याची लोकप्रियता आणि अभिनयामुळे ही मालिका टीआरपीच्या अव्वल क्रमांकामध्ये असते. त्यामुळे आता त्याच्या मुलाचीही या मालिकेत एन्ट्री होणार आहे.