मुंबई -अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आप्पा आणि बाप्पा', असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यापूर्वी खरं तर भरत आणि सुबोध यांनी 'उलाढाल' या चित्रपटात काम केलं होतं. मात्र, त्यामध्ये त्यांचे फारसे सीन्स एकत्र नव्हते. पण, ही सगळी कसर त्यांनी 'आप्पा आणि बाप्पा' या चित्रपटाद्वारे भरून काढली आहे.
काय आहे कथा -
या चित्रपटाची कथा पुण्यात राहणाऱ्या अप्पा कुलकर्णी म्हणजेच 'भरत'च्या घरात घडते. अप्पाचे वडील म्हणजेच दिलीप प्रभावळकर त्याला यंदाचा गणेशोत्सव थाटात साजरा करायला सांगतात. त्यासाठी त्याला पीएफमधून पैसे काढायला सांगतात.पण ऐनवेळी बँक पैसे द्यायला टाळाटाळ करते. त्यामुळे आप्पाला पैसे उसने घेऊन सण साजरा करावा लागतो. मात्र, ऐनवेळी देणेकरी डोक्यावर येऊन बसतात आणि तो थेट गणपती बाप्पाला आपल्याला या विघ्नातून बाहेर काढायला सांगतो. त्यांनंतर नक्की काय होतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
हे आहेत कलाकार -
भरत, सुबोध, दिलीप प्रभावळकर यांच्याप्रमाणेच सुनील जगताप आणि संपदा कुलकर्णी-जोगळेकर हे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'तुला पाहते रे' आणि 'अश्रूंची झाली फुले' नंतर सुनील आणि सुबोध यांची जोडी या चित्रपटातही एकत्र पाहायला मिळणार आहे. तर, संपदा कुलकर्णी-जोगळेकर ही देखील बऱ्याच दिवसांनी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.