पणजी (गोवा) - भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘गेल्या 50 वर्षातील भारतीय चित्रपटांची प्रगती’ या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई, शाजी एन करूण आणि चित्रपट समीक्षक डेरेक माल्कम यांनी आपली मतं व्यक्त केली. तसेच, अल्प खर्चाने बवलेले चित्रपट तसेच ओटीटी व्यासपीठ याबाबत चर्चा केली.
चित्रपटांच्या सामर्थ्याबद्दल बोलताना सुभाष घई यांनी सांगितले की, आपले चित्रपट सर्वाधिक परिणामकारक आहेत. ते आपल्या मिथकथा आणि वारसा यांची परिणीती आहेत. चित्रपट प्रेक्षकांसाठी समर्पक ठरावेत, ही आज महत्वपूर्ण गोष्ट आहे. मणिरत्नम यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून मला तामिळ संस्कृती आणि लोकांबद्दल माहिती मिळाली. बंगाली आणि मल्याळम चित्रपट अतिशय सुंदर आहेत अशी मते घई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा -IFFI 2019 : 'तुर्कस्तानच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर बनलाय 'कमिटमेंट''
बॉलिवूडने खूप मोठा पल्ला गाठला असून तंत्रज्ञानात खूप सुधारणा झाल्याचे चित्रपट समीक्षक डेरेक माल्कम यांनी सांगितले. ७० च्या दशकात जेव्हा मी पहिल्यांदा भारतात समीक्षक म्हणून नव्हे तर क्रिकेटर म्हणून आलो. त्यावेळी मुंबईत झालेल्या चित्रपट महोत्सवाला मी उपस्थित होतो. मात्र, या महोत्सवात एकही भारतीय चित्रपट दाखविण्यात आला नव्हता. अमेरिकेतील समीक्षकांबरोबर मी जेव्हा महोत्सवाच्या निर्देशकांशी चर्चा केली त्यावेळी आम्ही भारतीय चित्रपट दाखवत नाही. हे चित्रपट पाहायचे असतील तर चित्रपटगृहात जावे लागेल, असे सांगण्यात आले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे, असे ते म्हणाले.
चित्रपट म्हणजे भारताचा इतिहास असल्याचे चित्रपट निर्माते शाजी. एन. करूण म्हणाले. चित्रपटांचे अनेक पैलू असून ते मनोरंजन करतात तसेच अध्यात्मही शिकवतात. सत्यजित राय यांच्यासारख्या चित्रपट निर्मात्यांनी पुरेशा निधीशिवाय चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र, त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक ती बुद्धिमत्ता होती, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना
चित्रपट समीक्षक तरण आदर्श चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सुभाष घई, शाजी एन करूण, डेरेक माल्कम आणि तरण आदर्श यांचा आकाशवाणीच्या महानिर्देशक इरा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.