मुंबई -बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानची मुलगी सुहाना हिच्या सिनेसृष्टीतील पदार्पणाविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. सुहाना ही सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकीच एक आहे. त्यामुळेच तिच्या पदार्पणविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर असतात. आता लवकरच ती सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चाहुल लागली आहे. त्यापुर्वी ती एका शॉर्ट फिल्म द्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
'किंग खान'च्या लेकीचं अभिनयात पदार्पण, पहिलं पोस्टर प्रदर्शित - द ग्रे पार्ट ऑफ ब्लू
सुहाना एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पदार्पण करणार आहे. तिच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

सुहानाच्या पहिल्या शॉर्ट फिल्मचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' (the grey part of blue) असे तिच्या आगामी शॉर्ट फिल्मचे नाव आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'थिओडोर जिमेनो' (Theodore Gimeno) यांनी केले आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, सुहानाच्या कॉलेजमध्येच या शॉर्ट फिल्मचे शूटिंग झाले आहे. काही दिवसांपूर्वी तिचे शूटिंग दरम्यानचेही फोटो समोर आले होते. त्यामुळे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून का होईना आता सुहानाच्या अभिनयाची झलक लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.