शाहरुख खानचा 'बॉडी डबल' प्रशांत वालदे अभिनित 'प्रेमातूर'चे प्रदर्शन गेले पुढे! - rashant walde prematur movie release postponed
शाहरुख खानचा बॉडी डबल प्रशांत वालदे अभिनित प्रेमातूर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
![शाहरुख खानचा 'बॉडी डबल' प्रशांत वालदे अभिनित 'प्रेमातूर'चे प्रदर्शन गेले पुढे! srk body double rashant walde prematur movie release postponed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11699187-767-11699187-1620566840484.jpg)
गेली अनेक दशकं शाहरुख खान सुपरस्टार आहे आणि प्रशांत वालदे गेल्या १५ वर्षांपासून त्याच्या व्यावसायिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आता तुम्ही म्हणाल कोण हा प्रशांत वालदे? हे कसे शक्य आहे? प्रशांत हा शाहरुखचा ‘बॉडी डबल’ म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. या इंडस्ट्रीमध्ये ‘लूक अलाइक’ ‘बॉडी डबल’ आणि ‘डुप्लिकेट’ अशी सुपरस्टार्सची रूपे घेऊन फिरणारे कलाकार आहेत. त्यांना शूटिंगसाठी बोलावले जाते कारण लॉन्ग शॉट, ओव्हर द शोल्डर शॉट, फाईट सीन्स, पासिंग शॉट्स ई. साठी सुपरस्टार्स वेळ खर्ची घालत नाहीत. त्यावेळी निर्माते-दिग्दर्शक यांना या लोकांची गरज भासते.
प्रशांत वालदे हा ३-इन-१ एसआरके पॅकेज आहे. तो शाहरुख सारखा दिसतो, (लूक अलाइक), त्याची शारीरिक ठेवण एसआरके सारखीच आहे (बॉडी डबल) आणि तो शाहरुख सारखा नाचतो, फाइट्स करतो आणि तंतोतंतरित्या ‘मॅनरिझम्स’ करू शकतो (डुप्लिकेट). म्हणूनच शाहरुखने एखादा पिक्चर साइन केला की त्याची टीम प्रशांतला तयार राहण्यासाठी सांगते आणि निर्मात्यालाही त्याची कल्पना देते. प्रशांत स्वतः एक कोरियोग्राफर आहे त्यामुळे तो शाहरुख सारख्याच डान्स स्टेप्स करून रेफेरंस शॉट तयार करतो. तसेच फाइट्स असो वा लॉन्ग शॉट्स वगैरे तो शाहरुखच्या शॉट्सच्या आखणी करण्यास मदत करतो जो शाहरुख रेफेरंस शॉट म्हणून पाहतो व नंतर स्वतः परफॉर्म करतो. हे सर्व निर्माते दिग्दर्शक करीत असतात जेणेकरून लहान सहन गोष्टींसाठी शाहरुखचा वेळ वाया जाणार नाही.