मुंबई - बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला ५४ वा वाढदिवस होता. देशातच नाही, तर जगभरात शाहरुखची अफाट अशी लोकप्रियता पाहायला मिळते. त्यामुळे त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. दुबईमध्येही त्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात उंच असलेली इमारत बुर्ज खलिफावर त्याच्या नावाची रोषणाई करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
शाहरुखच्या या जंगी सेलिब्रेशनचा व्हिडिओ शाहरुखने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही तासातच या व्हिडिओवर ३ लाखापेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. शाहरुखने हा व्हिडिओ शेअर करुन हा क्षण आपल्यासाठी सर्वाधिक मोल्यवान असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा -#HBDWorldsBiggestMovieStar: ट्विटरवरही शाहरुख 'किंग खान', वाढदिवशी ट्रेण्ड होतोय हॅशटॅग
तर, दुसरीकडे चाहत्यांच्या गर्दीतला व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. आपला वाढदिवस एवढा खास बनवल्याबद्दल त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
बॉलिवूड कलाकारांनीही शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री काजोल हिनेही शाहरुखसोबतचा एक फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - शाहरुखचा वाढदिवस : 'मन्नत' बाहेर चाहत्यांचा जलवा