मुंबई - 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एका प्रश्नामुळे चर्चेत आला होता. या कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर या कार्यक्रमाला टीकेचे धनी व्हावे लागले. तसेच, संभाजी बिग्रेडकडूनही तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर अखेर या वादाप्रकरणी सोनी टीव्हीने जाहीर माफी मागितली आहे.
सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केबीसीचा एक व्हिडिओ शेअर करून प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
हेही वाचा -'केबीसी'मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, संभाजी ब्रिगेडचा तीव्र आंदोलनाचा इशारा
६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता सोनी टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा एक भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा 'एकेरी' उल्लेख करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी समोरच्या स्पर्धकाला 'इनमे से कौन से शासक मुघल सम्राट औरंगजेब के समकालीन थे'...? असा प्रश्न विचारला आणि या प्रश्नावर नंतर महाराणा प्रताप, राणा सांगा, महाराजा रणजीत सिंह आणि शिवाजी, असे ४ पर्याय देण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे संतप्त शिवप्रेमींनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले होते.
हेही वाचा -संभाजीराजेंनी केबीसी मालिकेवर व्यक्त केला संताप; वाहिन्यांनाही सेन्सॉरशीप लागू करण्याची केली मागणी