मुंबई - भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि प्रसिध्द अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ६ एप्रिलला ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. त्यांनी पक्ष का सोडला याचा खुलासा त्यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने केला आहे.
“भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय हा पूर्णपणे त्यांचा होता. जर तुम्ही एका ठिकाणी आनंदी नसाल तर तिथून बाहेर पडणेच योग्य असते. माझ्या वडिलांनीही तेच केलं. आता काँग्रेस पक्षासोबत ते जोडले गेले आहेत. ते काँग्रेससोबत चांगलं काम करु शकतील, अशी अपेक्षा आहे. किमान त्यांची या पक्षात कुचंबना तरी होणार नाही”, असे सोनाक्षीने म्हटले आहे.
आपल्या वडिलांनी जय प्रकाश नारायण, अटल बिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणींसारख्या लोकांसोबत काम केले आहे. भाजपमध्ये त्यांना मानाचे स्थान होते. मात्र आता तशी भाजप राहिली नसल्याचे सोनाक्षीने म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा पटना साहिब येथून भाजपचे खासदार आहेत. यावेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना भाजपने तिकीट दिले आहे. सिन्हादेखील याच मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.
दोन दिवसापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. औपचारिकदृष्ट्या त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला असला तरी ६ एप्रिलला धुमधडाक्यात प्रवेश होणार आहे.