महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तरुणाईला थिरकायला लावणारे 'फ्री हिट दणका’मधील 'दांडी गुल' गाणे! - सुनील मगरे दिग्दर्शित फ्री हिट दणका

क्रिकेट खेळावर आधारित 'फ्री हिट दणका' या आगामी चित्रपटातील 'दांडी गुल' हे जोशपूर्ण गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 'लय रुबाब दावू नका होईल दांडी गुल' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे तरुणाईला थिरकायला लावणारे आहे. आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेल्या या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे.

'फ्री हिट दणका’मधील 'दांडी गुल' गाणे
'फ्री हिट दणका’मधील 'दांडी गुल' गाणे

By

Published : Dec 8, 2021, 9:25 PM IST

क्रिकेट आणि चित्रपट यांचे खूप जवळचे नाते राहिले आहे. चित्रपट आणि क्रिकेट चे आपल्या देशातील लोक खूप मोठ्या प्रमाणावर अनुसरण करीत असतात. क्रिकेट या विषयावर आधारित एक नवीन चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे, 'फ्री हिट दणका’. क्रिकेट हा जोश, उत्साहाचा खेळ असून भारतात त्याला वेगळेच स्थान आहे. याच खेळावर आधारित 'फ्री हिट दणका' या आगामी चित्रपटातील 'दांडी गुल' हे जोशपूर्ण गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. 'लय रुबाब दावू नका होईल दांडी गुल' असे या गाण्याचे बोल असून हे गाणे तरुणाईला थिरकायला लावणारे आहे. आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभलेल्या या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे.

या चित्रपटातील 'रंग पिरतीचा बावरा' हे गाणे याआधी प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 'दांडी गुल' हे गाणे 'फँड्री' फेम सोमनाथ अवघडे, अपूर्वा एस. तसेच 'सैराट' चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यात सोमनाथ आणि तानाजी अगदी सहज नृत्य करताना दिसत असले तरी त्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे. सोमनाथ आणि तानाजी हे उत्तम अभिनेते आहेत परंतु नृत्यात ते तितकेसे निपुण नसल्याने नृत्यदिग्दर्शक सुजित कुमार यांनी या गाण्याच्या चित्रीकरणाअगोदर दोघांकडूनही १५ दिवस नृत्याची कार्यशाळा घेतली.

या सरावादरम्यान अनेकदा दोघांचे पाय सुजले होते परंतु जिद्द न सोडता त्यांनी प्रॅक्टिस केली. त्यांची ही मेहनत या गाण्यातून नक्कीच डोकावते. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचे, गावरान बाज असलेले हे गाणे प्रेक्षकांना थिरकायला लावणारे आहे. एसजीएम फिल्म्स प्रस्तुत 'फ्री हिट दणका' या चित्रपटात सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

सुनील मगरे दिग्दर्शित 'फ्री हिट दणका' या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटातून क्रिकेटमधील संघर्ष, चुरस, उत्सुकता, डावपेच तसेच ग्रामीण भागातील रांगडेपणा, ग्रामीण भाषेतील लहेजा हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'फ्री हिट दणका’ हा चित्रपट येत्या १७ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सिनेमागृहांत प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा - ‘कबीर सिंग’च्या यशानंतर शाहिद कपूरचा ‘जर्सी' ३१ डिसेंबरला होणार प्रदर्शित!

ABOUT THE AUTHOR

...view details