मुंबई - दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात चेहरे लपवून आलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला केला. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. याचा निषेध देशभर सुरू असून मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही या हल्ल्याचा निषेध करणारे ट्विट केले आहे.
सोनाली कुलकर्णीने आपल्या ट्विटवर लिहिलंय, ''आपल्या देशातील विद्यार्थ्यांचे रक्षण करु शकत नाहीत आणि दुसऱ्या देशातील अल्पसंख्यकांचे रक्षण करायला निघालेत.'' सोनालीचा हा थेट प्रहार होता सध्याच्या राजकीय घडामोडींवर. एका बाजूला जेएनयू, जामिया येथील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा मुद्दा ताजा आहे. शिवाय सीएए कायद्यात इतर देशातील अल्पसंख्यांक लोकांना भारतात आश्रय आणि संरक्षण देण्याचा मु्द्दाही गाजतोय. या पार्श्वभूमीवर सोनालीने आपले मत व्यक्त केलंय. सोनाली कुलकर्णीने अशी भूमिका घेऊन आपली विचार अभिव्यक्ती दाखवून दिली आहे.
सोनालीच्या या ट्विटनंतर तिला ट्रोल करणारे भरपूर आहेत. तिला लाखोल्या वाहिल्या जात आहेत तर काहीजण अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन कॉमेंट्स करीत आहेत. असे असले तरी सोनालीच्या समर्थनार्थही काही नेटकरी बोलताना दिसत आहेत. सध्या सोनालीचा 'धुरळा' हा चित्रपट येत आहे. या पार्श्वभूमीवर तिने केलेल्या ट्विटमुळे नवा धुरळा सोशल मीडियात उडालेला दिसतो.
जेएनयू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मनोरंजन जगत उतरले आहे. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज सेलेब्रिटीजनी विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करीत आंदोलन केले. अभिनेत्री दीपिका पदुकोणने तर जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थी युनियनच्या अध्यक्षा आयेशा घोषची विचारपूस केली. विद्यार्थी आंदोलनाला तिने आपला पाठिंबा दर्शवला होता.
सर्वसाधारणपणे अपवाद सोडले तर मराठी कलावंत राजकीय भूमिका घेण्यास कचरतात. आज देशभर जेएनयूचे समर्थक आणि विरोधक अशी उभी फाळणी विचारवंतामध्ये आहे. दीपिका जेएनयूमध्ये गेली याला विरोध सुरू झाला आहे. तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम राबवली जात आहे. मात्र दीपिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे.