पुणे -लोकसभा निवडणुकीच्या चौथा टप्प्यातील मतदान आज देशभरात पार पडत आहे. मुंबईत आज शेवटचा टप्पा पार पडत आहे. सकाळपासून अनेक कलाकारांनी मतदानाचे कर्तव्य बजावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिनेही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी तिने मतदान केले आहे.
सोनाली ही निगडी प्राधिकरण भागात राहायला आहे. तिने या प्राधिकरणातल्या निगडी ज्ञानप्रबोधन विद्यालयात मतदान केले.
सोनाली कुलकर्णीनेही बजावला मतदानाचा हक्क, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी केलं मतदान 'मतदानाचा हक्क मी कधी चुकवत नाही. सकाळी लवकर मतदान करण्यावर माझा भर असतो. मात्र, यावेळी शूटिंगमुळे उशीर झाल्याने दुपारी मतदान केले. मी माझे कर्तव्य बजावले. आता येणाऱ्या सरकारने त्यांचे कर्तव्य बजावावे', अशी अपेक्षा सोनालीने यावेळी व्यक्त केली.
'समाजात परिवर्तन होणे गरजेचे असते. निवडणुकीच्या माध्यमातून आपण चांगले परिवर्तन करणारे सरकार निवडून आणू शकतो. त्यामुळे सर्वांनी मतदान करा, असेही ती यावेळी म्हणाली. पुणे जिल्ह्यापेक्षा पिंपरी चिंचवडच्या मतदानाची टक्केवारी चांगली असल्याचा आनंद आहे, असेही ती मिश्किलपणे म्हणाली.
राजकारणात येण्याबद्दल ती म्हणाली, की 'मी अभिनयातच आनंदी आहे. मला राजकारण जमणार नाही, असे तिने स्पष्ट केले.