केदार शिंदे यांचा नवा कोरा चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत एमव्हीबी मीडिया निर्मित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका वैशिष्ठ्यपूर्ण पोस्टरने घोषणा करण्यात आली आहे.
आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घटना, एखादा संवेदनशील विषय, सामान्य माणसांचे प्रश्न अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने मांडण्याची ताकद केदार शिंदे यांच्या चित्रपटात असते. चित्रपटाच्या या घोषणेनिमित्त दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाला, “या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसोबत शेअर करताना मला आनंद होतोय. ते करण्यासाठी या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. मला कायम असे वाटते की, महिला दिन साजरा करण्यासाठी केवळ एकच दिवस पुरेसा नसून दररोजच महिलांचं काम, सहभाग, योगदान आणि आवाका याची जाणीव ठेवायला हवी. हाच विचार घेऊन हा चित्रपट मी निर्माण केला आहे आणि जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचं कर्तृत्व भारी ठरतं आहे. त्यांच्या याच धडाडीला माझा हा कलात्मक सलाम आहे.”