मुंबई -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्र शासनाने सिनेमागृहे बंद न करण्याचे ठरविल्यामुळे आणि अनेक हिंदी चित्रपटांनी प्रदर्शनं लांबविल्यामुळे मराठी चित्रपटांना स्पर्धा नाही. त्याच अनुषंगाने नुकतीच ‘झोंबिवली’ च्या निर्मात्यांनी ४ फेब्रुवारी ही प्रदर्शनाची तारीख २६ जानेवारी वर आणल्यामुळे ४ फेब्रुवारी चा स्लॉट रिकामा होता. आता ४ फेब्रुवारीला एक विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे नवीन वर्षात लोच्या करायला पूर्णपणे सज्ज झाले आहेत.प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा ‘लोच्या झाला रे’ (Lochya zala re) या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सुरेश जयराम यांच्या त्याच नावाच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी पारितोष पेंटर यांनी ‘धमाल’, ‘टोटल धमाल’ अशा बॉलिवूडच्या चित्रपटांचे लेखन केले आहे. संजय मेमाणे यांनी 'लोच्या झाला रे’चे छायाचित्रण केले असून त्यांनी याआधी ‘झिम्मा’, ‘हिरकणी’, ‘हाफ तिकीट’ अशा सुपरहिट चित्रपटांच्या छायाचित्रणाची धुरा सांभाळली होती.
सोशल मिडीयावर पोस्टरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. मुळात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे चारही कलाकार पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. असून कोणामुळे कोणाच्या आयुष्यात ‘लोच्या’ होणार आहे, हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे. या चित्रपटात विजय पाटकर, प्रसाद खांडेकर आणि रेशम टीपणीस यांच्याही प्रमुख भूमिका आहेत .