मुंबई - 'हिमालयाची सावली' हे नाटक १९७२ साली तुफान गाजलं होतं. या नाटकातील ज्येष्ठ अभिनेत्री शांता जोग यांच्या अभिनयाने सजलेली 'बयो' ही व्यक्तिरेखादेखील लोकप्रिय ठरली होती. आता हेच नाटक लवकरच नव्या साच्यात रंगभूमीवर येणार आहे. या नाटकात अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई या 'बयो'च्या भूमिकेत झळकणार आहे. शृजा प्रभूदेसाईने नाटक आणि मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
मात्र, ‘बयो’ या व्यक्तिरेखेतून एका वेगळ्या रुपात रंगमंचावर दिसणार आहेत. त्यांच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात नानासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे आहे.
हेही वाचा-हासू आणि आसू यांचा मिलाफ असलेला 'द स्काय ईझ पिंक' ट्रेलर अखेर रिलीज
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शृजा सांगतात की, ‘अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी ही आव्हानात्मक भूमिका आहे. या व्यक्तिरेखेचे वेगवेगळे कंगोरे साकारण्यात आव्हान असले तरी या व्यक्तिरेखेतून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहेत. माझ्या वयापेक्षा अधिक वयाची ही भूमिका असल्याने त्यासाठी आवश्यक भाव, देहबोली या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ही भूमिका करायची होती. 'बयो' आणि मी स्वतः कोकणातली असल्यामुळे तिची भाषा आणि लकबी पकडणं मला सोयीचं होत आहे. नाट्यरसिकांना ही भूमिका आवडेल, असा विश्वास शृजा व्यक्त करतात.