उत्तम संगीताचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मेळ असलेला ''श्री राम समर्थ'' हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादिपा फिल्म्सच्या दिपा प्रकाश सुरवसे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक संतोष तोडणकर दिग्दर्शित ''श्री राम समर्थ'' सिनेमाची मूळ संकल्पना विधीतज्ञ विजया प्रवीण माहेश्वरी यांची आहे. घराघरातील संस्कारांचा पाया असलेले "मनाचे श्लोक" याचे उद्गाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे.
रामदास स्वामीनी लिहिलेला 'दासबोध' ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी बलोपासना, नामस्मरणाचे महत्व समजावून दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि मार्गदर्शन ''श्री राम समर्थ'' सिनेमातुन दाखवण्यात आली आहे. लग्नातील ''सावधान'' या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील सिनेमात पाहण्यास मिळते.
श्री राम समर्थ सिनेमाचे संगीत दिग्दर्शन संजय मराठे आणि महेश नाईक या जोडीने केलेले आहे. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे तसेच नवोदित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका मीना निकम यांच्या सुमधुर आणि एकमेकांशी पूरक असणाऱ्या आवाजात या सिनेमातील पाच गाणी स्वरबद्ध करण्यात आलेली आहेत.
अभिनेता शंतनू मोघे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, महेश कोकाटे, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजयासुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमकं भाष्य करतात. कथा-पटकथा-संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केलं आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी दिले आहे. बुद्धिजीवी व रामरायाचे निस्सीम भक्त असलेल्या राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा आहे.