पुणे- लघुपट हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून सामाजिक प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतात. लघुपट हे आजच्या तरुण पिढीचे जवळचे माध्यम आहे. हे माध्यम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. लघुपटाला लोकाश्रय मिळण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.
मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित अकराव्या पुणे लघुपट महोत्सवाचे पारितोषिक वितरण मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. चित्रपट निर्मात्या माधुरी आशीरगडे, ज्येष्ठ लेखक श्रीकांत कुलकर्णी, राम झोंड, भालचंद्र सुपेकर, अनुप जोशी यावेळी उपस्थित होते.
अकराव्या पुणे लघुपट महोत्सवाचे आयोजन मकरंद अनासपुरे म्हणाले, की चित्रपटाकडे आजही लोक मनोरंजन म्हणून पाहत असले तरी चित्रपट हीसुद्धा समाजाची एक गरज आहे. लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून चित्रपट गृह बंद असल्यामुळे कलाकारांपासून ते सर्वसामान्य कामगारांपर्यंत अनेकांचे हाल झाले आहेत लवकरात लवकर चित्रपट गृह सुरू झाली आणि लोकांचा प्रतिसाद मिळाला तर ही परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
लघुपट महोत्सवात मॅरेज प्रपोजल हा तमिळ लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला. तर कालीपिली या लघुपटासाठी अमोल करंबे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. हाऊस ऑफ डिके या लघुपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक मिळाले. तर गुप्त आणि धागा या लघुपटांना सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटासाठी गौरविण्यात आले.
हेही वाचा - HBD Big B : ऐंशीच्या उंबरठ्यावरील अमिताभ म्हणतात, 'साठा तो पाठा, अस्सी तो लस्सी..!!'