पणजी -चित्रपट क्षेत्रात यायचे असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यावर मात करण्याची तयारी करूनच या क्षेत्रात पाऊल ठेवावे, असे मत 'गढूळ' या लघूपटाचे दिग्दर्शक गणेश शेलार यांनी व्यक्त केले. यावेळी निर्माते स्वप्नील सरडे उपस्थित होते.
गणेश शेलार यांचे दिग्दर्शन असलेला 'गढूळ' हा लघुपट 'ईफ्फी' महोत्सवात दाखवण्यात आला. याविषयी त्यांनी यावेळी चर्चा केली.
महाविद्यालयालयीन शिक्षण घेत असतानाच दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या चित्रपट विषयक कार्यशाळेत उपस्थित होतो. त्यानंतर 'जोखड' नावाचा लघूपट तयार केला होता. त्यानंतर कथालेखन-दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केले. त्यामुळे शिक्षण सोडून याकडे वळलो, असे गणेश यावेळी म्हणाले.
हेही वाचा -IFFI 2019 : 'तुर्कस्तानच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर बनलाय 'कमिटमेंट''
'गढूळ'ची कथा आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आहे. ती लिहिण्यासाठी एक वर्ष लागले. मात्र, याचे चित्रिकरण सात दिवसांत पूर्ण केले. कारण पहिल्या लघूपटातून खूप काही शिकता आले. अडथळे येतील मात्र, आधी सुरुवात महत्वाची आहे.
तर निर्माते सरडे म्हणाले, व्यवसायाने आर्किटेक्चर म्हणून काम करत असताना ही माझी पहिलीच निर्मिती आहे. चांगल्या हेतूने काम केले, तर त्याची फळेही चांगलीच मिळतात. आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता याची निर्मिती केली आहे. हा एक अनुभव घेण्याचा प्रयत्न आहे. लघूपट हा कथा मांडण्याचा वेगळा प्रकार आहे. शिवाय एका प्रकाराची दुसऱ्याशी तुलना करू नये.
हेही वाचा -IFFI 2019 : 'भारतीय चित्रपटांची प्रगती' विषयावर सुभाष घईंसह तज्ञांनी मांडले मत