मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानातील लाहोर शहरात लग्न समारंभात हजेरी लावत वधू वरांना आशीर्वाद दिला. मात्र, त्यांच्या विरोधकांना हे काही पटलेले दिसत नाही. सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
शत्रुघ्न सिन्हा हजर असलेल्या लग्नातील व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले. यात ते लाहोरमध्ये लग्नात हजर असलेले दिसतात. सध्या भारत आणि पाकमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील एका फोटोग्राफरने बुधवारी रात्री शेअर केला होता.
व्हिडिओमध्ये पाकिस्तानी स्टार रीमा दिसत आहे. सध्या दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओची खूप चर्चा सुरू आहे. यावर अद्याप शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया आलेली नाही. एका आघाडीच्या वेब साईटवरील माहितीमध्ये सिन्हा यांनी कव्वालीच्यावेळी लग्नसमारंभार प्रवेश केला होता.
टीका करणाऱ्या एका युजरने म्हटलंय, आपले जवान सीमेवर हुतात्मा होत आहेत आणि हे महाशय आपली दोस्ती निभावत आहेत. दुसरा एक म्हणतो, शत्रुघ्न सिन्हा लाहोरमध्ये काय करीत आहेत? आम्ही त्यांना विचारू, पण ते आम्हाला खामोश म्हणून गप्प करतील.
अलिकडेच सलमान खानने अमेरिकेतला एक लाईव्ह शो रद्द केला होता. कारण होते त्याचा आयोजक पाकिस्तानी होता. गेल्या वर्षी मीका सिंग एका लग्नासाठी पाकिस्तानला गेला होता तर त्यालाही टीकेचा सामना करावा लागला होता.