मुंबई -बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये रणवीर सिंग गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत आता एका सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचीही वर्णी लागली आहे.
'अर्जुन रेड्डी' फेम शालिनी पांडे या चित्रपटात रणवीरसोबत भूमिका साकारणार आहे. विजय देवरकोंडासोबत तिने साकारलेली 'अर्जुन रेड्डी'मध्ये 'प्रिती'ची भूमिका साकारली होती. आता 'जयेशभाई जोरदार' चित्रपटाच्या निमित्ताने ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
शालिनीने 'अर्जुन रेड्डी' चित्रपटात साकारलेली प्रितीची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. आता गुजराती तरुणीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीरसोबत भूमिका साकारण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं शालिनीने सांगितलं आहे.