गरबा प्रेमींसाठी सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज - Navaratri special gujarati song release
गायिका सावनी रविंद्र आता नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीशिवाय हिंदी, तमिळ, तेलगु ह्या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीने पहिल्यांदाच गुजरातीत गाणे गायले आहे.
विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र आता नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीशिवाय हिंदी, तमिळ, तेलगु ह्या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीने पहिल्यांदाच गुजरातीत गाणे गायले आहे. राधा-कृष्णाच्या अलौकिक प्रेमाला समर्पित ‘कानुडा’ हे भक्तीपर रास-गरबा गाणे रिलीज झाले आहे.
‘सावनी ओरीजीनल्स’ या तिच्या म्युजीकल सिरीजमधील हे तिसरे गाणे आहे. सावनी सांगते, “आमच्या घरी घट बसतात. आई नऊ दिवस उपवास करते. प्रत्येक दिवसाचा वेगळा नैवेद्य असतो. ह्या नऊ दिवसांतून एक वेगळीच उर्जा वर्षभरासाठी आपल्याला मिळते. त्यामुळे मला नवरात्रोत्सव खूप आवडतो. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. पण गुजराती गाणे गाण्याची इच्छा अपूर्ण होती. रास-गरब्याच्या ह्या गाण्याने ती पूर्ण झाली.”