मुंबई -प्रेक्षकांना तब्बल ७ वर्षे खिळवून ठेवत इतिहास घडवल्यानंतर आता कलर्सचा माइलस्टोन शो 'ससुराल सिमर का' या मालिकेचा दुसरा सीझन येत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी ससुराल सिमर का या लोकप्रिय फॅमिली ड्रामाने सिमर आणि तिच्या कुटुंबाची हृदयस्पर्शी कथा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. सर्वांना आवडतील अशा व्यक्तिरेखा या मालिकेत होत्या. सिमर आणि माताजी यांच्या व्यक्तिरेखा आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. ही मालिका आता एका नवीन सिमरची कहाणी दाखवणार आहे. नवीन सिमरची भूमिका राधिका मुथुकुमार करत आहे. तिला गायिका व्हायचे आहे, पण तिच्या आयुष्यात मोठी सिमर (दीपिका काकर) आणि गीतांजली देवी (जयती भाटिया) येतात आणि आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळते, अशी याची कथा आहे.
एक साधी, आधुनिक पण संवेदनशील अशी छोटी सिमर भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे आणि तिच्या बहिणींच्या छायेतच लहानाची मोठी झाली आहे. मोठ्या सिमरप्रमाणेच ती तिच्या मुल्ल्यांशी व तत्त्वांशी ठाम आहे. ती महत्त्वाकांक्षी आहे आणि तिला संगीताच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवायचा आहे. दुसरीकडे गीतांजली देवी जुन्या विचारांच्या आहेत. त्या त्यांचा नातू आरवसाठी (अविनाश मुखर्जी) आपल्या स्वप्नांहून जास्त महत्त्व कुटुंबाला देणाऱ्या मुलीच्या शोधात आहेत. अनुकूल मुलगी शोधून काढण्याची जबाबदारी त्या मोठ्या सिमरवर सोपावतात आणि हा शोध मोठ्या सिमरला छोट्या सिमरपर्यंत घेऊन येतो. छोटी सिमर आदर्श आहे. पण गीतांजली देवींच्या अपेक्षांपेक्षा वेगळी आहे. त्यांची आयुष्ये परस्परात विणली जातात आणि आदर्शांचा संघर्ष होतो. तसा छोट्या सिमरचा नवीन आयुष्य व नात्यांच्या शोधाचा प्रवास सुरू होतो, अशी कहाणी याची आहे.
व्हायाकॉम १८ च्या निना एलाविया जयपुरीया या मालिकेबद्दल म्हणाल्या, “देश सातत्याने साथीशी लढत असताना, आम्ही कलर्स वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांचे सर्वोत्तम पद्धतीने मनोरंजन करण्यासाठी काम करत आहोत. विशेषत: सध्याच्या कठीण काळात यातून खूपच दिलासा मिळतो. ससुराल सिमर का या आमच्या आयकॉनिक मालिकेचा दुसरा सीझन नवीन कथानक, जुन्या-नव्या व्यक्तिरेखा यांच्यासह घेऊन येताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”