'खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त बिस्किटसाठी राजकुमारीचा हुकूमच. खारी हे जग तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्नं मात्र बेमालूमपणे पाहते. याच दोघांची ही गोष्ट आहे.
पदरी गरिबी असली तरी तिच्या डोळ्यात कधीही पाणी आणू न देण्यासाठी, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत झटणाऱ्या आणि तिला फुलासारखं जपणाऱ्या बिस्कीटची आणि त्याच्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या खारीची. याचा प्रत्यय आपल्याला नुकत्याच रिलीज झालेल्या त्यांच्या गाण्यातून येतो. क्षितिज पटवर्धन यांचे शब्द आहेत. संगीतकार सुरज-धीरज या जोडीने संगीत दिले असून कुणाल गांजावाला यांनी स्वरबद्ध केलेले हे गाणं झी म्युझिकच्या द्वारे श्रोत्यांच्या भेटीस आलं आहे.