मुंबई- प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक एक्टर्स कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवाही मिळाली आहे. आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटामधल्या भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ दी ईयर’ हा पुरस्कार देऊन सईच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय.
झी टॉकीजचे मनापासून आभार मानताना सई म्हणते, “माझ्या कारकीर्दीत 'झी' नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिलंय. मला असं वाटतं, तुम्ही कितीही वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलात, तरीही परफॉर्मन्ससाठी जेव्हा पुरस्काराची दाद मिळते, तेव्हा ती लाखमोलाची असते. अशी शाबासकी तुम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते. विशेष धन्यवाद माझ्या दिग्दर्शकाला द्यावेसे वाटतायत. दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने मला पायल मेहताच्या भूमिकेत पाहिलं. माझी आणि अमेयची जोडी रूपेरी पडद्यावर चांगली दिसेल, हे त्याचे व्हिजन होते. उपेंद्रच्या रुपात मला एक चांगला मित्र मिळाला.”