मुंबई - नेटफ्लिक्सवरील 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरीजची बरीच चर्चा झाली. सेक्रेड गेम्सला मिळालेल्या या प्रतिसादानंतर 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनचीदेखील अधिकृत घोषणा करण्यात आली होती. आता या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागाची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. नेटफ्लिक्सने एक फोटो शेअर करून १४ दिवसांनी 'सेक्रेड गेम्स'चा सिक्वेल प्रदर्शित होण्याचे संकेत दिले आहेत.
हे पोस्टर शेअर करत नेटफ्लिक्सने 'इस बार क्या होगा भगवान भी नहीं जानता', असे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे.
'सेक्रेड गेम्स'मध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला. तसेच नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरीज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारीत होणाऱ्या या वेब सीरीजला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
अनुराग कश्यपचे सहदिग्दर्शन असलेल्या 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, राधिका आपटे आणि जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता या १४ दिवसांनी 'सेक्रेड गेम्स'बाबत काय नविन घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.