मुंबई -प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची जोडी असलेला 'साहो' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये प्रभास आणि श्रद्धाची दमदार झलक पाहायला मिळाली. आता या चित्रपटातील पहिलं गाणंदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.
'सायको सय्या' असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यात प्रभासच आणि श्रद्धाचा धमाकेदार डान्स पाहायला मिळणार आहे. त्या दोघांचाही या गाण्यातील लूक रिलीज करण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगला २०१७ मध्येच सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ट्रेलर अद्याप प्रदर्शित झाला नाही. मात्र, लवकरच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
यावर्षी १५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याचदिवशी अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होणार असल्यामुळे 'साहो'ला बॉक्स ऑफिसवर टक्कर मिळेल. तसेच या दोन चित्रपटांच्या शर्यतीत जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा चित्रपटही रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाच्या शर्यतीत बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट बाजी मारतो, हे पाहणे रंजक ठरेल.