सांगली -केवळ ग्लॅमरस म्हणून चित्रपट सृष्टीत आल्यास काहीच करता येणार नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले आहे. तसेच आजच्या तरुण पिढीने संधी मिळाल्यावर हुरळून जाऊ नये. शिकत राहावे. तसेच महिला कलाकारांनी 'नाही' म्हणण्याची हिम्मत दाखवली पाहिजे, असा सल्लाही रोहिणी यांनी दिला आहे. सांगलीमध्ये विष्णुदास भावे गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
रोहिणी हट्टंगडी यंदा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणाऱ्या विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. सांगलीमध्ये हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यंदाचा ५४ वा पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना देण्यात आला. विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या शानदार सोहळ्यात ९९ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात आला.
हेही वाचा -रोहिणी हट्टंगडींच्या उपस्थितीत नाट्य पंढरीत रंगभूमी दिन उत्साहात साजरा
शाल, भावे पदक, सन्मानचिन्ह व २५ हजार रोख देऊन यावेळी रोहिणी हट्टंगडी यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे पदाधिकारी आणि सांगलीकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.