मुंबई -पावसाळा आला की मुंबईतील रस्त्यांची अवस्था पाहण्यासारखी होत असते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांचे अगदी हाल होतात. महापालिकेचं याकडे लक्ष वेधण्यासाठी सुप्रसिद्ध आरजे मलिष्का ही पुन्हा परतली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांना तिने थेट चंद्राची उपमा देत उपरोधिक गाणं तयार केलं आहे. तिच्या या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय.
मागच्या वर्षी देखील आरजे मलिष्का बीएमसीवर आधारित 'सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय', या गाण्याने चर्चेत आली होती. तिचं हे गाणंदेखील प्रचंड गाजलं होतं. आता तिने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर करुन मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधले आहे.
'हम तो चांदपर चले गये मगर चांद खुद जमीन पर आया है' या वाक्यानं या व्हिडिओची सुरुवात होते. त्यानंतर मलिष्काचा हटके अंदाजही या गाण्यात पाहायला मिळतो. चंद्रावर ज्याप्रमाणे खड्डे पडलेले आहेत. अगदी तशाच प्रकारचे खड्डे आमच्या मुंबईच्या रस्त्यावर देखील आहेत, असंच तिनं या व्हिडिओतून दाखवलं आहे.